Tuesday, 3 June 2014

धर्मापुरीचा दुर्लक्षित ठेवा

धर्मापुरीचा दुर्लक्षित ठेवा

महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात अंबाजोगाई पासून सुमारे ३० किमी धर्मापुरी नावाचे गाव आहे. परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई या तालुक्यांच्या ठिकाणापासून सारख्याच अंतरावर वसलेले हे गाव मराठवाड्यातल्या इतर चार गावांसारखेच आहे. गावातून जाणारा एक मुख्य रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला वस्ती. अंबाजोगाई- घाटनांदूर-धर्मापुरी रस्त्यावर गावाच्या अलीकडेच उजव्या बाजूला दूरवर एक तलाव आणि त्याच्या बाजूला एक किल्लासदृश बांधकाम नजरेस पडते.

गावात गेल्यावर थोडी चौकशी केल्यावर सिमेंटच्या एका छोट्या रस्त्याने आपण किल्ल्यापर्यंत पोहोचतो. किल्ल्याला आता घरांचा विळखा पडलाय. पार अगदी परकोट काबिज करून किल्ल्याच्या आतल्या भिंतीपर्यंत हे बांधकाम केले गेलंय. समोर दिसणाऱ्या २०-२५ पायऱ्या चढून आपण पश्चिमाभिमुख असलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजा समोर येतो. चांगला १५-२० फूट उंच असलेला हा दरवाजा सध्या दिंडी दरवाजा इतकी जागा ठेऊन दगडांनी बुजवून टाकलाय. मानवी वर्दळ नसल्याने आता आजूबाजूला चांगलाच झाडोरा माजलाय.

तीन-साडेतीन फुटाच्या त्या महादरवाजा (?) मधून आत गेल्यावर दोन्हीबाजूला पहारेकऱ्याच्या देवड्या दिसून येतात. त्यापैकी डाव्या बाजूला वरती तटबंदीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पुढे पायवाट डाव्या बाजूला वळून आपल्याला एका विस्तीर्ण पटांगणात घेऊन जाते. आपण आता असतो एका विशाल मैदानात जे सगळ्या बाजूनी तटबंदीने वेढलेले आहे.
या किल्ल्याचा इतिहास काही कळला नाही आणि आसपास गावात चौकशी केली असता कुणालाही माहिती नव्हती. संपूर्ण तटबंदी शाबूत असलेल्या अतिशय मोजक्या किल्ल्यांपैकी हा एक. ८-१० बुरुज आणि तेही अत्यंत चांगल्या अवस्थेत असे फारच कमी ठिकाणी  मिळते. किल्ल्यात प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या बाजूला आणि समोर अशा दोन ठिकाणी कणगीवजा बांधकाम आढळते पण झाडाझुडुपांमुळे तिथे जाने अतिशय कठीण आहे. थोडे पुढे गेल्यावर एक अतिशय सुंदर अशी अष्टकोनी विहीर उजव्या बाजूला आहे पण ती जवळ गेल्याशिवाय लक्षातसुद्धा येत नाही. सुंदर कोरीव काम केलेल्या या विहिरीत उतरायला २५-३० पायऱ्या उतरून जाव्या लागतात. चार ठिकाणी तटबंदी वर चढण्यासाठी जिने  येतात. किल्ल्याच्या तलावाकडेच्या तटबंदीमध्ये बाहेरून देवीचे एक मंदिर आहे.







मात्र गावातले खरे आश्चर्य तर केदारेश्वर मंदिर. गावाच्या पूर्वेस एक रस्ता ओलांडून शेताच्या पलीकडे हे मंदिर वसलंय. ११-१२ व्या शतकात बांधलेले हे मंदिर चालुक्य शैलीतील आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, आणि गर्भगृह अशी सुंदर रचना येथे बघायला मिळते. मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर अतिशय सुंदर असे कोरीव काम आढळून येते.