Friday, 22 May 2026

हिमाचल मधील कांगडा किल्ला


हिमाचल प्रदेश हा जसा हिमालयासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो पुरातन मंदिर आणि किल्ले यांच्यासाठी सुद्धा आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं जशी मनाला भुरळ पाडतात तशीच ही जुनी मंदिर आणि किल्ले ही घालतात. इथल्या कांगडा जिल्ह्यात असाच एक पहाडी किल्ला आहे त्याला कांगडा दुर्ग असेही म्हणले जाते. याला पूर्वी नगरकोट किंवा त्रिगर्त असं नाव होतं. हे त्रिगर्त साम्राज्य व्यास किंवा बाणगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेलं होतं. खूप पूर्वी हा भाग पंजाब मध्ये मोडत असे. कांगडा दुर्ग त्याची अभेद्यता, वैभव आणि सामरिक दृष्ट्या ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या हा माँझी आणि बाणगंगा नद्यांच्या संगमावर स्थित आहे.

संगमावर असलेल्या एका डोंगरावर बांधलेला हा किल्ला जवळ जाईपर्यंत दृष्टिक्षेपात येत नाही. सामरिक दृष्ट्या संपूर्ण कांगडा खोऱ्यावर हा देखरेख करतो. किल्ल्याची तटबंदी सुमारे चार किलोमीटर लांब आहे आणि दोन बाजूंनी नदी तर दोन बाजूंनी उंच पहाडांनी हा दुर्गा वेढलेला आहे. पायथ्यापासून सुमारे 300 फूट उंच या किल्ल्याला गावाच्या बाजूने प्रवेशद्वार आहे. एका रुंद अशा फरसबंदी वाटेने आपण दुर्गात प्रवेश करतो.



दुर्गांत प्रवेश करताना प्रथमतः रणजीतसिंहद्वार नंतर आहिनी आणि अमिरी दरवाजा आपल्याला लागतात. पुढे एक चढाव चढून गेल्यावर जहांगीर दरवाजातून पण प्रवेश करतो. हा दरवाजा चौथा मुघल शासक जहांगीर यांच्या काळात बांधला गेल्याचे सांगतात. आहिनी दरवाजा पुढे चढावर तटबंदी डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आहे. या तटबंदीमध्ये एका ठिकाणी महिषासुरमर्दिनी आणि श्री गणेशाचे शिल्प अंकित आहे तसेच हनुमंत सुद्धा आहेत.

कदाचित इस्लामी राजवटीनंतर आणि इंग्रजांच्या आधी असलेल्या कटोच हिंदू राजवटीमध्ये किल्ल्याची डागडुजी झाली असावी. त्यादरम्यान ही शिल्प येथे लावली गेली असावी. पुढे यु टर्न घेऊन आपण जहांगीर दरवाज्यातून आत प्रवेश करतो.

त्यानंतर येतो एक अर्धवट चिणलेला दरवाजा. याच्या एका बाजूला गंगा तर दुसरीकडे यमुना अंकित आहे. याच्यापुढे उजव्या बाजूला एक विस्तीर्ण पटांगण आणि त्याच्या पलीकडे काही खोल्या आहेत. संपूर्ण फरसबंदी हे पटांगण कधीकाळी एखाद्या प्रचंड मंदिराच्या सभागृहाचा भाग असावा असं वाटतं. याचे स्तंभ पडलेले आहेत. वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला चार-पाच कळसांचे अवशेष ठेवलेले आहेत. त्यांच्या आकारमानावरून मूळ मंदिराचे कळस किती उंच आणि विस्तीर्ण असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. महाराष्ट्रातील अमृतेश्वर, गोंदेश्वर तसेच पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या कळसाच्या टोकाला असलेले दगडी चक्र इथेही आहेत. नागरशैलीतील हे भग्न मंदिर अजूनही जुन्या वैभवाच्या खुणा राखून आहे.

मार्गाच्या डाव्या हाताला उध्वस्त बांधकाम दिसते. हे कदाचित किल्लेदार, शिबंदी यांची घरे असावीत. इथेच एक कोरडी पडलेली विहीर सुद्धा आहे. तसेच दोन बारा ते पंधरा फुटांचे प्रचंड दगडी स्तंभही आहेत. त्यांच्यासमोर अजून दोन स्तंभाचे अवशेष आहेत. अशा या चार प्रचंड दगडी स्तंभांच येथील प्रयोजन काही लक्षात आलं नाही. त्याच मार्गाने थोडं वर आलं आणि मागे वळून बघितलं तर मंदिराच्या शिल्लक राहिलेल्या भिंतीचा बाह्यभाग आणि छताचे अवशेष दिसतात. अत्यंत सुंदर असं कोरीव काम इथे आहे. अगदी इंचभर सुद्धा जागा मोकळी दिसत नाही. त्यापुढे उजव्या हाताला एक समतल मैदान दिसतं. शिल्लक भिंती, त्यातील कोनाडे, छताची ठेवण यावरून ते कदाचित राजप्रसादाचा भाग असावा असं वाटतं. अजून काही पायऱ्या चढून आपला प्रवेश किल्ल्याच्या टोकावर होतो. इथेही एक हौद आणि राजप्रसादाचे अवशेष दिसतात. इथल्या टोकावरून नदीसंगम खूप सुरेख दिसतो. त्याशिवाय दूरवरचा बराच मुलुख नजरेत येतो.

इथून दिसणार दृश्य याच सामरिक महत्त्व अधोरेखित करतात. गंगा-यमुना दरवाजाच्या आधी थोड्या अंतरावर एक रस्ता किल्ल्याच्या मागील बाजूस जातो. अतिशय दाट जंगल आणि वन्य श्वापदांचा वावर यामुळे तेथून पुढे जाण्यास मज्जाव आहे. मात्र संकटकाळी वापर करण्यासाठीचा एखादा दरवाजा तिथे असावा असे वाटते. मुघलांनंतर संसारचंद या कटोच राजाच्या कारकीर्दीत 18 व्या शतकात या दुर्गाचा सुवर्णकाळ होता असे म्हणतात. त्यानंतर महाराजा रणजीत सिंग यांच्या अखत्यारित हा किल्ला होता. पुढे इंग्रजांकडे आल्यावर मात्र याच्याकडे दुर्लक्ष झालं. किल्ल्याचं सर्वात जास्त नुकसान 1905 साली आलेल्या भूकंपामुळे झालं.

निश्चितच या किल्ल्याने मोठं वैभव अनुभवलेलं असणार. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून सुद्धा जुन्या वैभवाची साक्ष पटते. इथे उत्खननात सापडलेल्या अवशेषांच एक सुंदर वस्तूसंग्रहालय पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या पायथ्याशी चालू केले आहे. ते सुद्धा आवर्जून बघण्यासारखं आहे. सह्याद्रीतल्या दुर्गांप्रमाणे राकट, कधी भीतीदायक, बेलाग वगैरे वाटत नसला तरी स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पर्यटक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना तो निश्चितच भुरळ घालतो.

Saturday, 18 April 2026

टाकळी ढोकेश्वर


परीक्षा घेण्याच्या निमित्ताने अहिल्यानगरला (पूर्वीचे अहमदनगर) जाणे झाले. परीक्षा सकाळी दहा वाजता चालू करायची होती. त्यामुळे सकाळचे चार तास दिमतीला होते. येतानाच जवळपासची ठिकाणं गुगलला विचारून घेतली होती त्यात टाकळी ढोकेश्वर च नाव सापडलं. या जागेबद्दल पूर्वी कधीतरी वाचल्याच आठवत होतं. म्हणलं चला या निमित्ताने भेट देणे होईल. अहिल्यानगर वरून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आहे. सकाळी सहा वाजता निघाल्याने रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी होती. शिवाय रस्ता नव्याने बनवला असल्याने खड्डे मुक्त होता. त्यामुळे साधारण ४०-४५ मिनिटात टाकळी गावापर्यंत पोहोचलो. पुढे पायथ्याशी जाईपर्यंत १५ मिनिटे लागली. गावातून पायथ्यापर्यंतचा रस्ता वळणावळणाचा आणि शेवटचे साधारण दीड-दोन किलोमीटर मातीचा आहे. पायरी मार्ग जिथून सुरू होतो तिथपर्यंत गाडी जाऊ शकते परंतु रस्ता दगड-मातीचा असल्याने वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.



पायथ्याशी पोहोचताक्षणी नजरेत भरते घडीव दगडांची तटबंदी आणि दरवाजा. जुन्या तटबंदीला काही ठिकाणी नव्याने दगड लावून केलेली डागडूजीही लक्षात येते. पायऱ्यांच्या बाजूला एक घुमटीवजा बांधकाम आढळते. आतमध्ये समाधी असावी असा चौथरा दिसतो. त्याच्या दरवाजावर आणि भिंतींवर अत्यंत सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. त्यात तोरणावरच्या गणेशपट्टी मधला साखळदंड अतिशय सुरेख आहे. पुढे पायऱ्या चढून दरवाजापर्यंत गेलं की तिथे एक शिलालेख आढळतो. दरवाजात उभे राहिल की डाव्या हाताला एका दगडावर जो भिंतीचा भाग आहे त्यावर तीन ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. देवनागरीमध्ये असलेल्या या शिलालेखाचे अद्याप वाचन झाले आहे की नाही याची माहिती मिळाली नाही, तथापि सिंगण असा एक शब्द त्यात असल्यामुळे यादव राजवटीशी शिलालेखाचा संबंध असावा असे वाटते.



वस्तुतः लेण्यांमधील कोरीव कामाची धाटणी चालुक्य आणि राष्ट्रकूट राजवटींच्या दरम्यानच्या काळाशी साद्ध्यर्म्य सांगते४०-४५ पायऱ्या चढून वर गेलं की उजवीकडे छोटंसं मैदान वजा मोकळी जागा दृष्टीस पडते. तिथे डावीकडे लेण्यांचे प्रवेशद्वार आहे. पुरातत्व खात्याच्या आखत्यारित असलेल्या या मंदिराला जाळीचा दरवाजा बसवून संरक्षित करण्यात आले आहे. बाहेर एक दीपमाळ ही दिसून येते. लेण्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूला आठ ते दहा फूट उंचीच्या स्त्री प्रतिमा कोरलेल्या आहेत. गंगा आणि यमुना यांचे त्या प्रतीक आहेत. त्यापैकी यमुनेची मूर्ती कालौघात थोडीशी भग्न झाल्यासारखी वाटते.



दरवाजातून आपण २५ x ४० फुटाच्या विस्तीर्ण सभामंडपात प्रवेश करतोसभामंडप चार मुख्य खांबांवर तोडून धरलेला दिसतो. चारही खांबांवर सुंदर असे कोरीव काम आहे. सभामंडपात उजवीकडे तांडव नृत्य करणारा महादेव तर डावीकडे सप्तमातृका ज्यांमध्ये ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, आणि चामुंडी यांचा समावेश होतो त्यांच्या वाहनांसमवेत तसेच गणपती मोदकांच्या राशी समवेत आणि वीरभद्र अतिशय रेखीवपणे दाखवण्यात आलेले आहेत. महादेवाच्या जवळ एका नागाची आकृतीही कोरलेली आहे.


सभामंडपात मध्यभागी एक छोटा नंदी आहेत्याच्यासमोर गर्भगृहाचे छोटे प्रवेशद्वार असून वाकून प्रवेश करावा लागतो. गर्भगृहाच्या छतावर नक्षीकाम दिसून येते. अजिंठा लेणीमध्ये आढळणाऱ्या भित्तिचित्रांसारखे हे नक्षीकाम वाटते. आता जरी ते काळवंडलेले दिसत असले तरी त्याची symmetry आणि एकंदरीतच pattern  गतवैभवाची साक्ष देतात. गर्भगृहात मध्ये प्रवेश केल्यावर समोर महादेवाची चौकोनी पिंड दृष्टीस पडते.


वंशपरंपरेने चालत आलेलं पुजारी पण गोसावी कुटुंब अत्यंत निष्ठेने पार पाडत असल्याने मंदिराची, शिवपिंडीची देखभाल अतिशय योग्य प्रकारे झालेली दिसून येते. सध्या श्री सार्थक गोसावी हे इथली साफसफाई आणि पूजाअर्चा याची व्यवस्था बघतातगर्भगृहाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या आकृती दिसतात. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या शेजारी जी आकृती आहे ती काही जणांना पूर्वीच्याकाळी पाणी वाहून नेणारे अर्थात भिस्ती यांची वाटते तर काहींना इतर वजन वाहून नेणारे वाटतात. गर्भगृहाला उत्तरेकडे अजून एक दरवाजा असून त्याच्या बाहेर एक पाच साडेपाच फुटाचा नंदी कोरलेला आहे. त्याच्या अलीकडे प्रदक्षिणा मार्गावर काही वीरगळीही आढळतात. प्रदक्षिणेच्या मार्गावर डावीकडे एका बंदिस्त जागेत अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. विष्णूच्या विविध रूपातील मूर्ती, गणेश, महादेवाच्या पिंडी आणि इतर अनेक भगनावस्थेतल्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. विष्णूच्या बहुतेक मूर्ती या केशव स्वरूपातील असून सहज ओळखू येतात.



गर्भगृहाची रचनाही काही प्रमाणात मुंबई जवळील घारापुरी आणि छत्रपती संभाजीनगरजवळच्या वेरूळ लेण्यांशी साद्ध्यर्म्य दाखवते. या मुख्य लेण्याबाहेर दीपस्तंभाजवळ उभा राहिलं की समोर प्रचंड मोठा कॅनव्हास उलगडून  ठेवल्यागत दृश्य दिसतंविस्तीर्ण सपाट जमीन, डोंगर, नदी, जलाशय अतिशय सुंदर दिसतात. लेण्यांच्या डावीकडे कातळात काही खोदीव टाकी आढळतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी ही सोय केलेली दिसून येते. मुख्य रस्त्यापासून दूर असलं तरी आवर्जून वाट वाकडी करून बघण्यासारखं हे सुंदर लेणं आहेपरंतु कालौघात काही प्रमाणात झळा पोहोचल्या आहेत, तरीसुद्धा जे काही शिल्लक आहे त्यातूनही आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव मनाला सुखावून जाते.

Saturday, 28 December 2024

बैजनाथ - हिमालयातील शिल्पवैभव


किल्ले लेण्या मंदिर यांची महाराष्ट्रात रेलचेल आहे. काळ्या दगडातल्या ह्या वास्तूंनी महाराष्ट्र समृद्ध आहे. ह्या वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं वैभवच जणू. अशा बऱ्याच लेण्या किल्ले मंदिर बघितल्यानंतर एक गैरसमज होऊ शकतो की महाराष्ट्रात सोडून इतरत्र असं काहीही नाही, केवळ महाराष्ट्रातच हे सारे आहे. पण अशातच हिमाचल प्रदेशला जाण्याचा योग आला. तिथे कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ मंदिर बघण्याची संधी मिळाली. धर्मशाला पासून सुमारे 50 किलोमीटरवर हे मंदिर आहे. दुरूनच मंदिराचे शिखर दिसता क्षणी यात काहीतरी वेगळ आहे असं जाणवत. जसं जसं मंदिराचं पूर्ण रूप समोर येतं तसं तसं महाराष्ट्राबद्दल असलेला गैरसमज दूर होत जातो, आणि जेव्हा पूर्ण मंदिर समोर येतं तेव्हा तर अवाक् होण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.


दोन प्रवेशद्वारे असलेल्या छोट्या तटबंदीच्या आत हे मंदिर आहे. साधारणतः सात ते आठ फूट उंच या तटबंदीच एक प्रवेशद्वार चार-पाच पायऱ्या चढून जावं लागतं तर दुसरं जमिनीच्या पातळीवरच आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता क्षणी लक्ष वेधून घेतात ते दोन नंदी. इतर शिवमंदिरांपेक्षा एक वेगळेपण असं की एरवी एकच नंदी असतो, मात्र इथे दोन आहेत. दुसरे असं की त्यातला एक उभा आहे. महाराष्ट्रातले सारे नंदी पाय दुमडून आणि मान थोडीशी वेळावून बसलेले दिसतात. इथे मात्र एक उभा आहे. प्रथमतः हा उभा नंदी यज्ञवराह वाटतो किंवा त्याची आठवण तरी करून देतो. मात्र पाठीवरची झूल, शिंग, वशिंड, गळ्याखालची पोळी हे सगळं हा नंदी असल्याची खात्री करून देतात. पाठीवरची झूल तर सुंदर आहेच पण त्याशिवाय गळ्यातली माळ आणि चक्क वेसण सुद्धा येथे कोरलेली आढळते. झुलीवर डाव्या बाजूला काही अक्षर कोरलेली आहेत. याच्यात आणि मंदिराच्या दरम्यान एका घुमटी खाली चौथर्‍यावर एक बैठया स्वरूपातील एक नंदी दिसतो. त्याच्या शेपटीजवळ एक मानवाकृती कोरलेली दिसून येते. कालौघात याची शिंग तुटली असावीत.


पुढे मंदिरात प्रवेश करताना चार नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात. त्यानंतर अजून दोन सुंदर खांबांमधून आपण मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो. सुमारे वीस बाय 25 फुटाचे हे सभागृह विस्तीर्ण आहे. गर्भगृह आणि दोन्ही बाजूला गवाक्ष चटकन नजरेत भरतात. सभागृहात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे शिलालेख कोरलेले आढळून येतात. या शिलालेखांशिवाय अजून चार ठिकाणी स्थानिक लिपित काही मजकूर कोरलेला दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार नागरशैलीतील हे मंदिर सुमारे 800 वर्षाहून अधिक काळ उभे आहे. आहुक आणि मान्युक अशा दोन व्यापाऱ्यांनी हे बांधल्याचा उल्लेख आढळतो. इथले शिलालेख शारदा लिपीतील संस्कृत भाषेत आणि तकरी लिपीतील पहाडी भाषेत आहेत. एका शिलालेखानुसार मंदिर बांधण्यापूर्वी सुद्धा इथे शिवलिंग अस्तित्वात होतं. आता जरी त्याला बैजनाथ असे संबोधक असले तरी मुळात ते वैद्यनाथ असं होतं. जयचंद्र राजा, इतर देणगीदार व्यापारी आणि काही वास्तूशिल्पी यांची नावे सुद्धा यात आहेत. याशिवाय कांगडा याचं जुनं नाव नगरकोट होतं असंही या शिलालेखातून कळतं. तटबंदीच्या आतून अनेक सुंदर मूर्ती आहेत. मात्र त्या इतरत्र तयार करून बांधकामादरम्यान त्यांच्या सध्याच्या जागांवर आणून बसवलेल्या वाटतात. यामध्ये नंदीवर आरूढ़ शिवपार्वती मूर्ती अत्यंत सुरेख आहे. त्यात नाग शिवाच्या गळ्याभोवती नसून डाव्या हातात आहे. डावीकडच्या कोपऱ्यात ब्रम्हदेव दिसून येतात. शिवाच्या मुकुटावर तत्कालीन वेशभूषेचा प्रभाव दिसून येतो. अजून एका शिल्पात शेषशायी विष्णू आहेत आणि त्यांचे पाय दाबून देणारी लक्ष्मी सुद्धा दाखवलेली आहे.




सभागृहात शिरता क्षणी एक गोष्ट जाणवते की पूर्ण सभागृह कोरीव काम आणि भरलेलं आहे. एक जागा, कोपरा, अगदी छतसुद्धा रिकाम दिसून येत नाही. प्रवेशद्वारावरील पट्टीका, दोन्ही बाजूचे द्वारपाल लक्षणीय आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूला सुंदर द्वारपाल आहेत. सभागृहातील गवाक्ष आवर्जून बघण्यासारखे आहेत. त्यांवर कोरलेल्या स्त्रियांच्या अंगावरील आभूषणे, वस्त्रप्रावरणे तर देखणी आहेतच पण त्यांच्या केश संभारांच्या अदा सध्याच्या हेअर स्टाईल्सना सुद्धा लाजवणाऱ्या आहेत. याशिवाय पुरुष आकृतींच्या डोक्यावर असलेल्या टोपी सध्याच्या हिमाचली टोप्यांशी साधर्म्य पावणाऱ्या आहेत. खीरगंगा नदीच्या किनाऱ्यावरील हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे डाव्या गवाक्षातून हिमालयाची बर्फाच्छादितशी शिखरं लक्ष वेधून घेतात. हिमालयाच्या पाच रांगांमधील धौलाधार रांग इथून स्पष्ट दिसते आणि त्या कॅनव्हास वर मंदिराच दृश्य अवाक करत. कोरीव काम केवळ मंदिराच्या आत आहे असं नाही तर बाह्य भिंतीवर सुद्धा सुंदर शिल्प कोरलेली आहेत. विष्णूच्या दशावतारांपैकी वराह, कुर्म, मत्स्य, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, आणि कृष्ण अवतारांची शिल्पे सहज ओळखू येतात. मंदिराच्या तटबंदीबाहेर एक पुष्करणी सुद्धा आहे.



मंदिराच्या तटबंदी बाहेर एक पुष्करिणी आहे. त्यात सध्या पाणी नसलं तरी पूर्वीचं वैभव लपत नाही. एकूणच शिल्प वैभवानी समृद्ध असं हे मंदिर, हिमालयाची पार्श्वभूमी, खळाळत वाहणारी नदी, आणि या सगळ्यांच्या मिलाफाने जे सौंदर्य तयार होतं ते काही औरच आहे. त्याची अनुभूती प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय येणे नाही...

अलौकिक शिल्पसौंदर्य : अन्वा येथील शिवमंदिर

 


महाराष्ट्राला लेण्या आणि मंदिरांच्या रूपाने शिल्पकलेचा मोठा समृद्ध वारसा लाभला आहे. लेण्यांच्या बाबतीत तर भारतात आढळणाऱ्या लेण्यांपैकी सुमारे ८०% लेण्या या महाराष्ट्रात आहेत. सह्याद्री ज्यापासून तयार झालेला आहे त्या बेसॉल्ट दगडापासून आपल्या पूर्वजांनी इथे मंदिरेसुद्धा उभारली. अशा काळ्या दगडातील मंदिरांना आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखल्या जाते. खरे तर पुरातत्त्वशास्त्र किंवा भारतविद्या यांनुसार यादवांचे प्रधान हेमाद्रीपंत आणि या मंदिर स्थापत्याचा तसा काही संबंध नाही. दगडांमध्ये खाचा करून आणि इतर दगड त्यात गुंफून ही मंदिरे उभारली जात. त्याला शुष्कसांधा स्थापत्य असेही म्हणतात कारण चुना अथवा सिमेंटसदृश कोणताही पदार्थ त्यात वापरला जात नसे. इसवी सनाच्या १२-१३ व्या शतकापर्यंत साधारणतः अशा मंदिरांची उभारणी झालेली दिसून येते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी मंदिरे आढळून येतात. अशाच धाटणीचं एक सुंदर मंदिर, त्यापेक्षा कलाकृती म्हणूयात, औरंगाबाद जवळ आहे. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर सिल्लोड या तालुक्याच्या ठिकाणाहून थोडे पुढे, गोळेगाव फाट्यापासून आत सुमारे १० किलोमीटर अंतरावर अन्वा हे एक छोटे गाव आहे. कित्येक शतकांपासून या गावाने हा अनमोल ठेवा जपलाय. गाडीरस्ता थेट मंदिरापर्यंत आहे. परंतु अगदी जवळ जाईपर्यंत मंदिराचं अस्तित्व लक्षात येत नाही. कालौघात म्हणा किंवा परकीय आक्रमणामुळे मंदिराला कळस शिल्लक नाही. त्याऐवजी सिमेंटच लिंपण केलेलं दिसून येत.

आता सगळ्याबाजूंनी घरांनी वेढलेल्या विस्तीर्ण अशा आवारात प्रवेश करताक्षणी नजरेत भरते ते ४-५ फूट उंचीचे जोतं. या जोत्यावरील मंदिराची उंची साधारण १५-२० फूट असावी. ज्यावेळी मंदिर अखंड असेल त्यावेळी गाभाऱ्यावरील शिखरासहित मंदिराची उंची किमान ३०-४० फूट भरत असावी. मंदिराच्या पिठाच्या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूला असलेले द्वारपाल लक्ष वेधून घेतात. सभामंडपात प्रवेश करताक्षणी नजरेत भरतात ते अत्यंत सुरेख असे शिल्पकाम केलेले स्तंभ. लहान-मोठे मिळून सुमारे ५० स्तंभ या मंदिरात आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची सुंदर मूर्ती आहे. केवळ स्तंभच नाही तर सभामंडप आणि गर्भगृहाच्या छतावर सुद्धा अत्यंत देखणे असे शिल्पकाम आढळते. लक्षात येण्यासारखे म्हणजे सभागृहाचे छत हे एकसंध, एकाच दगडाचे नसून दगडाच्या अनेक छोट्या तुकड्यांपासून, त्यांना एकमेकांमध्ये सांधून बनवण्यात आलेले आहे.

गर्भगृहाच्या छतावर असलेले नक्षीकाम एखाद्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसते. त्यातही आतमध्ये एक मनुष्याकृती कोरलेली आहे. गर्भगृहात अंधार असल्याने प्रकाश टाकल्यावरच हे आश्चर्य दिसते. मंदिराच्या खांबांवरील शिल्पांची प्रमाणबद्धता पाहून कोणीही आश्चर्य चकित होईल इतकी ती सुंदर आहेत. केवळ प्रमाणच नाही तर त्यांच्या हालचालींचे बारकावे, चेहऱ्यावरील भावमुद्रा सारेच बघण्यासारखे आहेत. बाहेरील बाजूनेही सर्वात खाली हंसपट्टी, त्याच्यावरच्या स्तरामध्ये हत्ती, सिंह, मनुष्य अशा विविध आकृती अंकित आहेत. इथली मानवी आकृत्यांची वस्त्रप्रावरणे, आभूषणे आज सुद्धा फॅशन म्हणून वापरली जाऊ शकतात इतकी देखणी आणि लक्षणीय आहेत.



या सर्व शिल्पांव्यतिरिक्त अजून एक आश्चर्य ह्या मंदिराने जोपासलंय. शंख, चक्र, गदा, आणि पद्म यांच्या क्रमानुसार चतुर्भुज विष्णूंची केशव, नारायण, माधव, संकर्षण इत्यादी २४ रूपे सर्वश्रुत आहेतच. याच २४ प्रकारांचे स्त्रीरूपातील अंकन गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर केलेले आहे. वाङ्मयात यांचे वर्णन विष्णूंच्या २४ शक्ती असे केलेले आढळते.

तसे पाहिले तर मंदिर शिवाचे परंतु त्यावर अंकन विष्णूंच्या २४ रूपातील शक्तींचे. एका अर्थाने शैव आणि वैष्णव पंथांचा सुंदर मिलाफ इथे आपल्याला पाहायला मिळतो. विचारधारा वेगळया, दैवतं वेगळी, उपासनेचे विधी वेगळे तरीही शिल्पकलेच्या माध्यमातून दोन्हीही पंथ इथे तादात्म्य पावलेत. कुणा एकाला कमी अथवा जास्त न लेखता अशी समरसता दर्शवणे ही जशी शिल्पकाराच्या उच्चकोटीच्या कौशल्याची प्रचिती, तशीच ती भारतीय संस्कृतीच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या सांस्कृतिक प्रवाहाच्या दिव्यत्वाची अनुभूती..!

पाटेश्वर देवस्थान संकुल, सातारा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

यानुसारच अगदी दगडांचा कणखरपणा आणि फुलांचा कोमलपणा एकाच ठिकाणी अनुभवायचे असेल तर पाटेश्वर देवस्थान अतिशय योग्य स्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे १०-१२ किलोमीटर अंतरावर देगांव MIDC जवळ हे ठिकाण आहे. देगांव पार केल्यावर छोटासा घाटरस्ता आपल्याला डोंगरावर घेऊन जातो. थोड्या सपाटीवर तेथे गाडी लावून पुढे चालत निघायचे. येथे येण्यासाठी बोरगाव मार्गे सुद्धा एक रस्ता आहे पण देगावची वाट जास्त प्रचलित आहे. सुरुवातीच्या टप्प्यात थोड्या पायऱ्या अन उजवीकडे बाजूला श्रीगणेशाची रिद्धीसिद्धीसहित शेंदूर लेपित मूर्ती कोरलेली दिसते. एकटा गेलो होतो म्हणून “बिबटे आणि रानडुकरांचा वावर तेथे आहे” अशी सूचना वाचून जरा धडकी भरली खरी पण तुम्ही एकटे नसाल तर घाबरण्याची गरज नाही. पण थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

पायऱ्या संपल्यावर पायवाट पुढे डोंगरातून जवळपास एक दिड किलोमीटर असेल. दोन्ही बाजूला जंगल आणि त्यातून पक्षांचा गुंजारव सतत कानी पडत असतो. त्याचबरोबर मुंगूस, साळींदर, माकडे, साप, रानडुक्कर यांच्या हालचालींमुळे पाल्यापाचोळ्याचा आवाज येत असतो. आपण एकटे नसल्याची जाणीव सतत सोबत असते. आपल्याला एखादा प्राणी-पक्षी दिसला कि आपल्याला भारी वाटते पण जंगलात शिरण्याअगोदरच शंभरावर नजरा आपला मागोवा घेत असतात याची जाणीवही आपल्याला नसते. परंतु प्राण्यांचे मनुष्यासारखे नसते, आपण डिवचल्याखेरीज ते त्रास देत नाहीत.


मुख्य मंदिराजवळ आले की उजवीकडे एक बांधीव तलाव दिसतो. भरपूर कमळे त्यात नेहमीच फुललेली दिसतात. पायवाट तलावासमोरच्या आश्रमासमोर संपते. गोविंदस्वामी महाराजांचा आश्रम आणि तलाव यांच्यामधून बांधीव पायऱ्यांचा मार्ग मुख्य मंदिराकडे जातो. मंदिर प्रकारच्या अलीकडे एक पायवाट उजवीकडे जाते. तेथे एक छोटी घुमटीवजा मंदिर आहे. त्याआधी एका वृक्षाला टेकून एक गरुडमूर्ती उभी आहे. मंदिर प्राकारात शिरण्यापूर्वी डावीकडे भिंतीमध्ये एक प्रचंड शिवलिंग आहे. तर उजवीकडे एका देवडीमध्ये हनुमानाची मूर्ती आहे. छोट्या तटबंदी मधून आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. फरसबंदी प्रांगण, दोन दीपस्तंभ, छोट्या घुमटीमधला नंदी आणि मंदिराची एकूणच रचना कसल्याशा गूढतेची जाणीव करून देतात. मुख्य मंदिराशिवाय इथे महिषासूर मर्दिनी आणि चतुर्मुख ब्रह्मदेव यांचीही छोटी मंदिरे आहेत. शेषशायी विष्णूची देखील एक सुंदर मूर्ती इथे नजरेस पडते. मंदिराच्या एकंदरीत रचनेवरून ते ४००-५०० वर्षे पुरातन असावे असा अंदाज आहे. मंदिराच्या तटबंदीला वळसा घालून वरच्या बाजूला गेल्यास तेथे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. मोरावर आरूढ एक छोटी मूर्ती तेथे आहे. बोरगावची वाट कार्तिक स्वामी मंदिराच्या याजवळ पोहोचते.

मुख्य मंदिराव्यतिरिक्त येथे अन्य ८ मंदिरे आहेत जी आश्रमाच्या मागच्या बाजूला गुहांमध्ये आहेत. ही मंदिरेच खरेतर इथली मुख्य आकर्षण आहेत. असंख्य शिवपिंडी येथे गुहांमधून, मंदिरातून आढळून येतात. एका गुहेवजा मंदिरात इथे अग्निवृष मूर्ती आहे. ऋग्वेद आणि इतर भारतीय ग्रंथात वर्णन केल्यानुसार सात हात, तीन पाय आणि दोन डोके अशा मानव आणि वृषभ अशा दोहोचाभास होणारी सुंदर मूर्ती इथे आहे. प्रथमदर्शनी मूर्ती नंदीची वाटते पण तो अग्निवृष आहे. भारतात इतरत्र अशी मूर्ती आढळल्याची नोंद नाही. ऋग्वेदातील वर्णन याला चपखल लागू पडते.

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |

तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

 अग्निवृष मंदिराच्या पाठीमागे गुहांमध्ये ब्रह्मिणी, वैष्णवी, आणि माहेश्वरी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. खाली कोरलेल्या त्यांच्या वाहनांवरून आपण ते सहज ओळखू शकतो. इतर गुहांमध्ये असंख्य शिवपिंडी आढळून येतात. त्याशिवाय इतरही अनेक कोरीवमूर्ती तेथे आहेत पण संशोधनाअभावी त्यावर व्यक्त होणे धारिष्ट्याचे ठरेल. सर्वात शेवटी इथे वऱ्हाडघर मंदिर आहे. इथल्या नंदीच्या अंगावरील कोरीवकाम अप्रतिम आहे. याठिकाणी एक चतुर्मुख शिवपिंड आहे. याशिवाय लिंगाच्या जागी दोन कुंभ असलेले कुंभेश्वर महादेव देखील इथे आहे. इथल्या मंदिरात मूळ शिवलिंगावर असंख्य शिवपिंडी कोरलेल्या आहेत. हजाराहूनदेखील त्या जास्त असाव्यात. त्याशिवाय इथल्या खांबावरील कोरीव काम अतिशय सुंदर आहे. येथे नवग्रह शिळेवर कोरलेले आढळून येतात. काहींच्या मते ते विष्णू अवतार आहेत. सप्तमातृका इथे एका शिळेवर कोरलेल्या आहेत. त्यात एक गणेश शिल्प सुद्धा आहे. अतिशय पुसट आणि अगम्य असा एक शिलालेख इथे आहे. कदाचित देवनागरी लिपीमधील असावा. पण अजूनतरी त्याचे वाचन करण्यात यश आलेले नाही.

 मुख्य पाटेश्वर मंदिरापेक्षा या सर्वांचा काळ बराच जुना आहे. एकंदरीतच इथले वातावरण गूढतेने भारलेले आहे. त्यात जंगल आणि किमान मानवी हस्तक्षेप अधिकच भर घालतो. पुरातनकाळी शाक्त किंवा इतर अघोरी पंथाच्या उपासनेचे हे मुख्य स्थान असावे असे वाटते. सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र हे दिवस सोडल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे सकाळी ९ नंतर आणि सायंकाळी ५ पूर्वी भेट देणे उचित ठरेल. अजूनही हे ठिकाण फ़ार प्रसिद्ध नाही परंतु पर्यटकांची नसली तरी संशोधकांची पाऊले इकडे वळावी ही अपेक्षा. इतका मोठा अनमोल ठेवा इथे आहे. मात्र ज्ञात इतिहास त्याबाबत अनभिज्ञ आहे. स्थानिकांनाही त्याबाबत फारशी माहिती नाही. शेकडो वर्षांपासून या साऱ्या मूर्ती, मंदिरे मुकेपण वागवत आहेत. कुण्या संशोधकांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करायला हवा. ही सारी दगडं जर बोलायला लागली तर फार मोठ्या इतिहासावरचा पडदा बाजूला होईल आणि आपल्या सांस्कृतिक, सामाजिक वारशात अजून मोलाची भरच पडेल.


शिल्पवैभव: लोणी भापकरचा यज्ञवराह

पुण्याच्या पूर्वेस साधारण ८०-९० किलोमीटर अंतरावर, जेजुरीच्या पुढे बारामती रस्त्यावर लोणी भापकर हे गाव आहे. तसे पाहिले तर इतर चार गावांसारखेच हे गाव. पण शिल्पवैभवाने समृद्ध. गावात शिरल्यावर मल्लिकार्जुन देवस्थानचा रस्ता विचारात जायचे. वाटेत उजव्या हाताला सोमेश्वर नावाचं एक छोटेखानी मंदिर आहे. त्यावर काही विशेष कोरीव काम नाही पण समोरच्या मोकळ्या जागेत सुमारे १५-२० वीरगळ आहेत. अर्थात पूर्वी कधीतरी इथे मोठ्या लढाया झाल्या असणार किंवा इथले वीर समरांगणी धारातीर्थी पडले असणार. इतिहासाच्या अभ्यासकांना आणि जाणकारांना हे वीरगळ म्हणजे मोठीच मेजवानी ठरेल.


इथून पुढे उजवीकडे वळून थोडे अंतर गेले की डाव्या हाताला मोठे आणि स्वच्छ प्रांगण दृष्टीस पडते. इथे आहे मल्लिकार्जुन देवस्थान. मंदिराकडे जाताना एका चिंचेच्या झाडाखाली वराहमूर्ती दिसते. मुखाकडचा भाग जरा भग्न झाला आहे परंतु त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. शिल्पाच्या पाठीवरील कोरीवकाम जणू झूल पांघरल्या सारखे वाटते. यावर १४२ मूर्ती अंकित आहेत. त्याशिवाय चारही पायांवर विविध मूर्ती आणि आभूषणे कोरलेली आहेत. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात वालूर, चारठाणा, गोसावी पिंपळगाव या जागी वराहमूर्ती सापडल्या आहेत. मध्यप्रदेशात खजुराहो आणि सागर जिल्ह्यातील ऐरन येथे अशा मूर्ती सापडल्याचे उल्लेख आहेत. परंतु एकंदरच अशी शिल्प अत्यंत दुर्मिळ. इसवी सनाच्या १२-१३ शतकापर्यंत अशा यज्ञ वराहांचे पूजन होत असे, त्यानंतर त्यांची जागा विष्णू मूर्तींनी घेतली असावी असे जाणकारांचे मत आहे. 


मल्लिकार्जुन मंदिर हे भूमिज शैलीतील असून २ प्रवेशद्वारे आहेत. यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य आहे. आत शिरल्यावर सभामंडप तोलून धरणारे ४ खांब त्यांच्यावरच्या कोरीवकामाने आपले लक्ष वेधून घेतात. छतावरील कोरीवकामसुद्धा लक्षणीय आहे. मंदिराची रचना अर्ध्यापर्यंत दगड आणि त्यावरील शिखर हे विटांमधून अशी आहे. कालौघात १२ व्या शतकातील हे मंदिर जरासे डावीकडे झुकलेले आहे. 

मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या अत्यंत सुंदर अशा प्रतिमा आहेत. तसेच डावीकडच्या कोनड्यामध्ये एक भग्न विष्णुमूर्ती आहे. परंतु हातातील आयुधे झिजलीअसल्याने विष्णुमूर्तींच्या २४ प्रकारांपैकी ती कोणती हे ओळखणे कठीण आहे. शिवलिंगाची दिशा हि नेहमीप्रमाणे उत्तरेकडे नसून पूर्वेकडे आहे. अभिषेकाचे तीर्थ वाहून जाण्यासाठीचा मूळ मार्गही येथे नाही. शिवाय गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस कोठेही याला गोमुख / मकरमुख अस्तित्वात नाही. यावरून असे लक्षात येते कि हे मंदिर मूलतः विष्णूंचे होते. परंतु यावनी आक्रमणादरम्यान मूळ मूर्ती भग्न झाल्याकारणाने अथवा लपवली गेल्याने नंतर मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी.

मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यासमोर एक रेखीव अशी पुष्करिणी आहे. काही पायऱ्या उतरून थोडी सपाटी आणि परत पायऱ्या अशी याची रचना आहे. या पुष्करिणीच्या भिंतीमध्ये २४ कोनाडे आहेत. बहुतेक त्यात विष्णूंच्या हातातील आयुधक्रमानुसार २४ प्रकारांच्या एकेक मूर्ती असाव्यात ज्या कालौघात इतरत्र विखुरल्या गेल्या असतील. कदाचित पुष्करिणीमध्ये मूर्तिभन्जकांच्या भीतीने विसर्जित किंवा लपवल्या सुद्धा असतील. पायऱ्यांच्या डाव्या हाताला पुष्करिणीच्या कडेला एक दगडी मंडप आहे. त्यावरसुद्धा अत्यंत सुंदर अशी शिल्पे अंकित आहेत. काही अभ्यासकांच्या मते हा वराह मंडप असून प्रांगणात असलेल्या वराह मूर्तीची मूळ जागा ही असावी.  

एकंदरीतच मंदिर, पुष्करिणी आणि वराहमूर्ती असा सुंदर मिलाफ इथे बघायला मिळतो. ऊन, पाऊस, वारा यांचे आघात सोसत हा वारसा शेकडो वर्षे त्याचे अस्तित्व जपून आहे. त्यात सुधारणा करत नाही आली तर किमान आहे त्या अवस्थेत आपण त्याचे जतन करू शकलो तरी खूप आहे.

Wednesday, 13 April 2016

कृष्णाकाठचं वैभव - खिद्रापूरचा कोपेश्वर



‘संथ वाहते कृष्णामाई’ या गीताची अनुभूती कानासोबत नजरेला सुद्धा होते 

असे एक सुंदर स्थळ आहे. कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहुबाजूला 

काळीभोर कसदार जमीन आणि त्यावर उसाचे मळे. उन्हाळ्यात देखील 

सुखावणारी हिरवळ. कोल्हापूर जिल्ह्यातले खिद्रापूर गाव पण सांगलीवरून जवळ. 

कोल्हापूरहून इचलकरंजी मार्गे अथवा सांगलीहून नरसोबाचीवाडी- कुरुंदवाड मार्गे 

इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येउन बसलेला. दक्ष 

कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग 

साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्रीविष्णूनी केले त्यांचे 

नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा 

त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे कि येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी 

नाही. महादेवाच्या आधी नंदी चे दर्शन येथे नाही. कदाचित कालौघात किंवा 

आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे.




इतिहास सांगतो कि साधारणतः ७ व्या शतकाच्या आसपास चालुक्य 

राजवटीत याच्या उभारणीची सुरुवात झाली असावी. पुढे ११-१२ व्या शतकांत 

शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या 

बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, 

हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.



या मंदिराचं खरे सौंदर्य दडलंय त्याच्या रचनेत. छोट्याश्या दरवाजातून 

आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो आणि समोर उलगडत जातो कित्येक 

शतकांचा इतिहास. समोर दिसत असतो ४८ खांबांवर तोललेला एक मंडप. 

स्वर्गमंडप. आतमध्ये जाऊन बघितल्यावर लक्षात येत कि त्याला तर छतच नाहीये. 

पण नीट लक्षपूर्वक बघितले कि कळते संपूर्ण वर्तुळाकार रिकामी जागा मुद्दाम ठेवली 

गेलीये. या स्वर्गमंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर 

बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. हा मंडप तोलणाऱ्या खांबावरची कलाकुसर 

तर नजर ठरू देत नाही. प्रत्येक स्तंभ वेगळा आहे. कोठेही नक्षीकाम दुसऱ्यासारखे 

नाही. अतिशय रेखीव असलेले हे कोरीवकाम पाहताच बसावेस वाटते.

पुढे सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या 

बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत.  

दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला ५-५ द्वारपाल आहेत.

मुख्य सभामंडप  देखील खूप सुंदर आहे. स्वर्ग मंडपाच्या द्वाराव्यतिरिक्त त्याला उत्तर आणि दक्षिण दिशेला सुद्धा प्रवेशद्वारे आहेत. यज्ञ चालू असताना भाविकांना दर्शन घेण्यात 

अडचण येऊ नये म्हणून कदाचित ही सोय असेल. जरा अंधारा असलेला हा सभा 

मंडप सुंदर कोरीव कामांनी युक्त असलेल्या खांबांनी तोललेला आहे. येथून पुढे 

गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली 

दिसते. या 'रांगोळीची' 'SYMMETRY' विशेष लक्षात येण्यासारखी आहे. 

गर्भगृह जरासे अंधारे आहे परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती 

आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून 

दिसतात. केवळ भिंतीच नाही तर सभामंडप आणि गर्भगृहाच्या छतावर देखील 

उत्तम कोरीवकाम आहे. कमळाच्या उमलणाऱ्या पाकळ्याप्रमाणे भासणारी 

छतावरील नक्षीसुद्धा खूप सुंदर आहे.


केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी 

परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या 

आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे ५-६ फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या 

पायाजवळ सर्व बाजूनी हत्ती कोरलेले आहेत जणू ते मंदिराला त्यांच्या पाठीवर 

तोलत आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती 

दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सर्व दक्षिण 

भारतीय राजवटीमध्ये हत्तीला खूप महत्व असल्याने किंवा तो शुभ आणि 

सामर्थ्याचे प्रतिक असल्याने मंदिराच्या कोरीवकामात अनेक ठिकाणी तो दिसून येतो.


सभामंडपाच्या दक्षिण दरवाज्य बाहेर एक पुरातन शिलालेख आहे. अन्य 

शिलालेखांप्रमाणे हा सुद्धा पुरातत्व खात्याच्या "विशेष मर्जीतला" असल्याने 

त्यालाही उन्हा-पावसाचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतोय. हळूहळू तो पुसट 

होत चाललाय. लवकर लक्ष दिले गेले नाही तर इतिहासाचा अजून एक ठेवा आपण 

कायमचा गमावून बसू. मंदिराच्या प्रांगणात इतस्ततः अनेक मूर्तींचे अवशेष 

विखुरलेले दिसतात. विशेष म्हणजे त्यात एक "वीरगळ" सुद्धा आहे. मंदिराच्या 

स्थापत्याचे अजून एक विशेष म्हणजे सभामंडपाच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा 

आहे. परंतु सभामंडपाचे तिन्ही बाजूचे कोरीव काम सारखेच आहे. त्यामुळे त्तर 

आणि दक्षिणेस ही कदाचित स्वर्गमंडप असावा असे वाटते. शेवटी ती शक्यताच. 

नवीन बांधणे तर सोडाच पण कालौघात शिल्लक राहिलेला हा अद्भुत ठेवासुद्धा 

आपण जपू शकलो तर पूर्वजांनी केलेल्या कामाचे, त्यांच्या कष्टाचे थोडे तरी ऋण 

चुकवल्याचे समाधान मिळेल. शेवटी इतकी वर्षे कृष्णेच लक्ष होतेच ना. आता 

तुम्ही-आम्ही लक्ष द्यायला काय हरकत आहे..?