हिमाचल प्रदेश हा जसा हिमालयासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो पुरातन मंदिर आणि किल्ले यांच्यासाठी सुद्धा आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं जशी मनाला भुरळ पाडतात तशीच ही जुनी मंदिर आणि किल्ले ही घालतात. इथल्या कांगडा जिल्ह्यात असाच एक पहाडी किल्ला आहे त्याला कांगडा दुर्ग असेही म्हणले जाते. याला पूर्वी नगरकोट किंवा त्रिगर्त असं नाव होतं. हे त्रिगर्त साम्राज्य व्यास किंवा बाणगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेलं होतं. खूप पूर्वी हा भाग पंजाब मध्ये मोडत असे. कांगडा दुर्ग त्याची अभेद्यता, वैभव आणि सामरिक दृष्ट्या ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या हा माँझी आणि बाणगंगा नद्यांच्या संगमावर स्थित आहे.
संगमावर असलेल्या एका डोंगरावर बांधलेला हा किल्ला जवळ जाईपर्यंत दृष्टिक्षेपात येत नाही. सामरिक दृष्ट्या संपूर्ण कांगडा खोऱ्यावर हा देखरेख करतो. किल्ल्याची तटबंदी सुमारे चार किलोमीटर लांब आहे आणि दोन बाजूंनी नदी तर दोन बाजूंनी उंच पहाडांनी हा दुर्गा वेढलेला आहे. पायथ्यापासून सुमारे 300 फूट उंच या किल्ल्याला गावाच्या बाजूने प्रवेशद्वार आहे. एका रुंद अशा फरसबंदी वाटेने आपण दुर्गात प्रवेश करतो.
दुर्गांत प्रवेश करताना प्रथमतः रणजीतसिंहद्वार नंतर आहिनी आणि अमिरी दरवाजा आपल्याला लागतात. पुढे एक चढाव चढून गेल्यावर जहांगीर दरवाजातून पण प्रवेश करतो. हा दरवाजा चौथा मुघल शासक जहांगीर यांच्या काळात बांधला गेल्याचे सांगतात. आहिनी दरवाजा पुढे चढावर तटबंदी डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आहे. या तटबंदीमध्ये एका ठिकाणी महिषासुरमर्दिनी आणि श्री गणेशाचे शिल्प अंकित आहे तसेच हनुमंत सुद्धा आहेत.
कदाचित इस्लामी राजवटीनंतर आणि इंग्रजांच्या आधी असलेल्या कटोच हिंदू राजवटीमध्ये किल्ल्याची डागडुजी झाली असावी. त्यादरम्यान ही शिल्प येथे लावली गेली असावी. पुढे यु टर्न घेऊन आपण जहांगीर दरवाज्यातून आत प्रवेश करतो.
त्यानंतर येतो एक अर्धवट चिणलेला दरवाजा. याच्या एका बाजूला गंगा तर दुसरीकडे यमुना अंकित आहे. याच्यापुढे उजव्या बाजूला एक विस्तीर्ण पटांगण आणि त्याच्या पलीकडे काही खोल्या आहेत. संपूर्ण फरसबंदी हे पटांगण कधीकाळी एखाद्या प्रचंड मंदिराच्या सभागृहाचा भाग असावा असं वाटतं. याचे स्तंभ पडलेले आहेत. वर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला चार-पाच कळसांचे अवशेष ठेवलेले आहेत. त्यांच्या आकारमानावरून मूळ मंदिराचे कळस किती उंच आणि विस्तीर्ण असतील याचा अंदाज आपण बांधू शकतो. महाराष्ट्रातील अमृतेश्वर, गोंदेश्वर तसेच पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या कळसाच्या टोकाला असलेले दगडी चक्र इथेही आहेत. नागरशैलीतील हे भग्न मंदिर अजूनही जुन्या वैभवाच्या खुणा राखून आहे.
मार्गाच्या डाव्या हाताला उध्वस्त बांधकाम दिसते. हे कदाचित किल्लेदार, शिबंदी यांची घरे असावीत. इथेच एक कोरडी पडलेली विहीर सुद्धा आहे. तसेच दोन बारा ते पंधरा फुटांचे प्रचंड दगडी स्तंभही आहेत. त्यांच्यासमोर अजून दोन स्तंभाचे अवशेष आहेत. अशा या चार प्रचंड दगडी स्तंभांच येथील प्रयोजन काही लक्षात आलं नाही. त्याच मार्गाने थोडं वर आलं आणि मागे वळून बघितलं तर मंदिराच्या शिल्लक राहिलेल्या भिंतीचा बाह्यभाग आणि छताचे अवशेष दिसतात. अत्यंत सुंदर असं कोरीव काम इथे आहे. अगदी इंचभर सुद्धा जागा मोकळी दिसत नाही. त्यापुढे उजव्या हाताला एक समतल मैदान दिसतं. शिल्लक भिंती, त्यातील कोनाडे, छताची ठेवण यावरून ते कदाचित राजप्रसादाचा भाग असावा असं वाटतं. अजून काही पायऱ्या चढून आपला प्रवेश किल्ल्याच्या टोकावर होतो. इथेही एक हौद आणि राजप्रसादाचे अवशेष दिसतात. इथल्या टोकावरून नदीसंगम खूप सुरेख दिसतो. त्याशिवाय दूरवरचा बराच मुलुख नजरेत येतो.
इथून दिसणार दृश्य याच सामरिक महत्त्व अधोरेखित करतात. गंगा-यमुना दरवाजाच्या आधी थोड्या अंतरावर एक रस्ता किल्ल्याच्या मागील बाजूस जातो. अतिशय दाट जंगल आणि वन्य श्वापदांचा वावर यामुळे तेथून पुढे जाण्यास मज्जाव आहे. मात्र संकटकाळी वापर करण्यासाठीचा एखादा दरवाजा तिथे असावा असे वाटते. मुघलांनंतर संसारचंद या कटोच राजाच्या कारकीर्दीत 18 व्या शतकात या दुर्गाचा सुवर्णकाळ होता असे म्हणतात. त्यानंतर महाराजा रणजीत सिंग यांच्या अखत्यारित हा किल्ला होता. पुढे इंग्रजांकडे आल्यावर मात्र याच्याकडे दुर्लक्ष झालं. किल्ल्याचं सर्वात जास्त नुकसान 1905 साली आलेल्या भूकंपामुळे झालं.
निश्चितच या किल्ल्याने मोठं वैभव अनुभवलेलं असणार. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून सुद्धा जुन्या वैभवाची साक्ष पटते. इथे उत्खननात सापडलेल्या अवशेषांच एक सुंदर वस्तूसंग्रहालय पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या पायथ्याशी चालू केले आहे. ते सुद्धा आवर्जून बघण्यासारखं आहे. सह्याद्रीतल्या दुर्गांप्रमाणे राकट, कधी भीतीदायक, बेलाग वगैरे वाटत नसला तरी स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पर्यटक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना तो निश्चितच भुरळ घालतो.
No comments:
Post a Comment