परीक्षा घेण्याच्या निमित्ताने अहिल्यानगरला (पूर्वीचे अहमदनगर) जाणे झाले. परीक्षा सकाळी दहा वाजता चालू करायची होती. त्यामुळे सकाळचे चार तास दिमतीला होते. येतानाच जवळपासची ठिकाणं गुगलला विचारून घेतली होती त्यात टाकळी ढोकेश्वर च नाव सापडलं. या जागेबद्दल पूर्वी कधीतरी वाचल्याच आठवत होतं. म्हणलं चला या निमित्ताने भेट देणे होईल. अहिल्यानगर वरून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर आहे. सकाळी सहा वाजता निघाल्याने रस्त्यावर वर्दळ अतिशय कमी होती. शिवाय रस्ता नव्याने बनवला असल्याने खड्डे ‘मुक्त’ होता. त्यामुळे साधारण ४०-४५ मिनिटात टाकळी गावापर्यंत पोहोचलो. पुढे पायथ्याशी जाईपर्यंत १५ मिनिटे लागली. गावातून पायथ्यापर्यंतचा रस्ता वळणावळणाचा आणि शेवटचे साधारण दीड-दोन किलोमीटर मातीचा आहे. पायरी मार्ग जिथून सुरू होतो तिथपर्यंत गाडी जाऊ शकते परंतु रस्ता दगड-मातीचा असल्याने वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे.
पायथ्याशी पोहोचताक्षणी नजरेत भरते घडीव दगडांची तटबंदी आणि दरवाजा. जुन्या तटबंदीला काही ठिकाणी नव्याने दगड लावून केलेली डागडूजीही लक्षात येते. पायऱ्यांच्या बाजूला एक घुमटीवजा बांधकाम आढळते. आतमध्ये समाधी असावी असा चौथरा दिसतो. त्याच्या दरवाजावर आणि भिंतींवर अत्यंत सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत. त्यात तोरणावरच्या गणेशपट्टी मधला साखळदंड अतिशय सुरेख आहे. पुढे पायऱ्या चढून दरवाजापर्यंत गेलं की तिथे एक शिलालेख आढळतो. दरवाजात उभे राहिल की डाव्या हाताला एका दगडावर जो भिंतीचा भाग आहे त्यावर तीन ओळींचा शिलालेख कोरलेला आहे. देवनागरीमध्ये असलेल्या या शिलालेखाचे अद्याप वाचन झाले आहे की नाही याची माहिती मिळाली नाही, तथापि ‘सिंगण’ असा एक शब्द त्यात असल्यामुळे यादव राजवटीशी शिलालेखाचा संबंध असावा असे वाटते.
वस्तुतः लेण्यांमधील कोरीव कामाची धाटणी चालुक्य आणि राष्ट्रकूट राजवटींच्या दरम्यानच्या काळाशी साद्ध्यर्म्य सांगते. ४०-४५ पायऱ्या चढून वर गेलं की उजवीकडे छोटंसं मैदान वजा मोकळी जागा दृष्टीस पडते. तिथे डावीकडे लेण्यांचे प्रवेशद्वार आहे. पुरातत्व खात्याच्या आखत्यारित असलेल्या या मंदिराला जाळीचा दरवाजा बसवून संरक्षित करण्यात आले आहे. बाहेर एक दीपमाळ ही दिसून येते. लेण्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूला आठ ते दहा फूट उंचीच्या स्त्री प्रतिमा कोरलेल्या आहेत. गंगा आणि यमुना यांचे त्या प्रतीक आहेत. त्यापैकी यमुनेची मूर्ती कालौघात थोडीशी भग्न झाल्यासारखी वाटते.
दरवाजातून आपण २५ x ४० फुटाच्या विस्तीर्ण सभामंडपात प्रवेश करतो. सभामंडप चार मुख्य खांबांवर तोडून धरलेला दिसतो. चारही खांबांवर सुंदर असे कोरीव काम आहे. सभामंडपात उजवीकडे तांडव नृत्य करणारा महादेव तर डावीकडे सप्तमातृका ज्यांमध्ये ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, आणि चामुंडी यांचा समावेश होतो त्यांच्या वाहनांसमवेत तसेच गणपती मोदकांच्या राशी समवेत आणि वीरभद्र अतिशय रेखीवपणे दाखवण्यात आलेले आहेत. महादेवाच्या जवळ एका नागाची आकृतीही कोरलेली आहे.
सभामंडपात मध्यभागी एक छोटा नंदी आहे. त्याच्यासमोर गर्भगृहाचे छोटे प्रवेशद्वार असून वाकून प्रवेश करावा लागतो. गर्भगृहाच्या छतावर नक्षीकाम दिसून येते. अजिंठा लेणीमध्ये आढळणाऱ्या भित्तिचित्रांसारखे हे नक्षीकाम वाटते. आता जरी ते काळवंडलेले दिसत असले तरी त्याची symmetry आणि एकंदरीतच pattern गतवैभवाची साक्ष देतात. गर्भगृहात मध्ये प्रवेश केल्यावर समोर महादेवाची चौकोनी पिंड दृष्टीस पडते.
वंशपरंपरेने चालत आलेलं पुजारी पण गोसावी कुटुंब अत्यंत निष्ठेने पार पाडत असल्याने मंदिराची, शिवपिंडीची देखभाल अतिशय योग्य प्रकारे झालेली दिसून येते. सध्या श्री सार्थक गोसावी हे इथली साफसफाई आणि पूजाअर्चा याची व्यवस्था बघतात. गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या आकृती दिसतात. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या शेजारी जी आकृती आहे ती काही जणांना पूर्वीच्याकाळी पाणी वाहून नेणारे अर्थात ‘भिस्ती’ यांची वाटते तर काहींना इतर वजन वाहून नेणारे वाटतात. गर्भगृहाला उत्तरेकडे अजून एक दरवाजा असून त्याच्या बाहेर एक पाच साडेपाच फुटाचा नंदी कोरलेला आहे. त्याच्या अलीकडे प्रदक्षिणा मार्गावर काही वीरगळीही आढळतात. प्रदक्षिणेच्या मार्गावर डावीकडे एका बंदिस्त जागेत अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. विष्णूच्या विविध रूपातील मूर्ती, गणेश, महादेवाच्या पिंडी आणि इतर अनेक भगनावस्थेतल्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. विष्णूच्या बहुतेक मूर्ती या केशव स्वरूपातील असून सहज ओळखू येतात.
गर्भगृहाची रचनाही काही प्रमाणात मुंबई जवळील घारापुरी आणि छत्रपती संभाजीनगरजवळच्या वेरूळ लेण्यांशी साद्ध्यर्म्य दाखवते. या मुख्य लेण्याबाहेर दीपस्तंभाजवळ उभा राहिलं की समोर प्रचंड मोठा कॅनव्हास उलगडून ठेवल्यागत दृश्य दिसतं. विस्तीर्ण सपाट जमीन, डोंगर, नदी, जलाशय अतिशय सुंदर दिसतात. लेण्यांच्या डावीकडे कातळात काही खोदीव टाकी आढळतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी ही सोय केलेली दिसून येते. मुख्य रस्त्यापासून दूर असलं तरी आवर्जून वाट वाकडी करून बघण्यासारखं हे सुंदर लेणं आहे. परंतु कालौघात काही प्रमाणात झळा पोहोचल्या आहेत, तरीसुद्धा जे काही शिल्लक आहे त्यातूनही आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव मनाला सुखावून जाते.
.jpeg)
%20(1).jpeg)
%20(1).jpeg)
.jpeg)
%20(1).jpeg)
%20(1).jpeg)
No comments:
Post a Comment