किल्ले लेण्या मंदिर यांची महाराष्ट्रात रेलचेल आहे. काळ्या दगडातल्या ह्या वास्तूंनी महाराष्ट्र समृद्ध आहे. ह्या वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं वैभवच जणू. अशा बऱ्याच लेण्या किल्ले मंदिर बघितल्यानंतर एक गैरसमज होऊ शकतो की महाराष्ट्रात सोडून इतरत्र असं काहीही नाही, केवळ महाराष्ट्रातच हे सारे आहे. पण अशातच हिमाचल प्रदेशला जाण्याचा योग आला. तिथे कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ मंदिर बघण्याची संधी मिळाली. धर्मशाला पासून सुमारे 50 किलोमीटरवर हे मंदिर आहे. दुरूनच मंदिराचे शिखर दिसता क्षणी यात काहीतरी वेगळ आहे असं जाणवत. जसं जसं मंदिराचं पूर्ण रूप समोर येतं तसं तसं महाराष्ट्राबद्दल असलेला गैरसमज दूर होत जातो, आणि जेव्हा पूर्ण मंदिर समोर येतं तेव्हा तर अवाक् होण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

दोन प्रवेशद्वारे असलेल्या छोट्या तटबंदीच्या आत हे मंदिर आहे. साधारणतः सात ते आठ फूट उंच या तटबंदीच एक प्रवेशद्वार चार-पाच पायऱ्या चढून जावं लागतं तर दुसरं जमिनीच्या पातळीवरच आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करता क्षणी लक्ष वेधून घेतात ते दोन नंदी. इतर शिवमंदिरांपेक्षा एक वेगळेपण असं की एरवी एकच नंदी असतो, मात्र इथे दोन आहेत. दुसरे असं की त्यातला एक उभा आहे. महाराष्ट्रातले सारे नंदी पाय दुमडून आणि मान थोडीशी वेळावून बसलेले दिसतात. इथे मात्र एक उभा आहे. प्रथमतः हा उभा नंदी यज्ञवराह वाटतो किंवा त्याची आठवण तरी करून देतो. मात्र पाठीवरची झूल, शिंग, वशिंड, गळ्याखालची पोळी हे सगळं हा नंदी असल्याची खात्री करून देतात. पाठीवरची झूल तर सुंदर आहेच पण त्याशिवाय गळ्यातली माळ आणि चक्क वेसण सुद्धा येथे कोरलेली आढळते. झुलीवर डाव्या बाजूला काही अक्षर कोरलेली आहेत. याच्यात आणि मंदिराच्या दरम्यान एका घुमटी खाली चौथर्यावर एक बैठया स्वरूपातील एक नंदी दिसतो. त्याच्या शेपटीजवळ एक मानवाकृती कोरलेली दिसून येते. कालौघात याची शिंग तुटली असावीत.

पुढे मंदिरात प्रवेश करताना चार नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात. त्यानंतर अजून दोन सुंदर खांबांमधून आपण मंदिराच्या सभागृहात प्रवेश करतो. सुमारे वीस बाय 25 फुटाचे हे सभागृह विस्तीर्ण आहे. गर्भगृह आणि दोन्ही बाजूला गवाक्ष चटकन नजरेत भरतात. सभागृहात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे शिलालेख कोरलेले आढळून येतात. या शिलालेखांशिवाय अजून चार ठिकाणी स्थानिक लिपित काही मजकूर कोरलेला दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार नागरशैलीतील हे मंदिर सुमारे 800 वर्षाहून अधिक काळ उभे आहे. आहुक आणि मान्युक अशा दोन व्यापाऱ्यांनी हे बांधल्याचा उल्लेख आढळतो. इथले शिलालेख शारदा लिपीतील संस्कृत भाषेत आणि तकरी लिपीतील पहाडी भाषेत आहेत. एका शिलालेखानुसार मंदिर बांधण्यापूर्वी सुद्धा इथे शिवलिंग अस्तित्वात होतं. आता जरी त्याला बैजनाथ असे संबोधक असले तरी मुळात ते वैद्यनाथ असं होतं. जयचंद्र राजा, इतर देणगीदार व्यापारी आणि काही वास्तूशिल्पी यांची नावे सुद्धा यात आहेत. याशिवाय कांगडा याचं जुनं नाव नगरकोट होतं असंही या शिलालेखातून कळतं. तटबंदीच्या आतून अनेक सुंदर मूर्ती आहेत. मात्र त्या इतरत्र तयार करून बांधकामादरम्यान त्यांच्या सध्याच्या जागांवर आणून बसवलेल्या वाटतात. यामध्ये नंदीवर आरूढ़ शिवपार्वती मूर्ती अत्यंत सुरेख आहे. त्यात नाग शिवाच्या गळ्याभोवती नसून डाव्या हातात आहे. डावीकडच्या कोपऱ्यात ब्रम्हदेव दिसून येतात. शिवाच्या मुकुटावर तत्कालीन वेशभूषेचा प्रभाव दिसून येतो. अजून एका शिल्पात शेषशायी विष्णू आहेत आणि त्यांचे पाय दाबून देणारी लक्ष्मी सुद्धा दाखवलेली आहे.

सभागृहात शिरता क्षणी एक गोष्ट जाणवते की पूर्ण सभागृह कोरीव काम आणि भरलेलं आहे. एक जागा, कोपरा, अगदी छतसुद्धा रिकाम दिसून येत नाही. प्रवेशद्वारावरील पट्टीका, दोन्ही बाजूचे द्वारपाल लक्षणीय आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशाच्या दोन्ही बाजूला सुंदर द्वारपाल आहेत. सभागृहातील गवाक्ष आवर्जून बघण्यासारखे आहेत. त्यांवर कोरलेल्या स्त्रियांच्या अंगावरील आभूषणे, वस्त्रप्रावरणे तर देखणी आहेतच पण त्यांच्या केश संभारांच्या अदा सध्याच्या हेअर स्टाईल्सना सुद्धा लाजवणाऱ्या आहेत. याशिवाय पुरुष आकृतींच्या डोक्यावर असलेल्या टोपी सध्याच्या हिमाचली टोप्यांशी साधर्म्य पावणाऱ्या आहेत. खीरगंगा नदीच्या किनाऱ्यावरील हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्यामुळे डाव्या गवाक्षातून हिमालयाची बर्फाच्छादितशी शिखरं लक्ष वेधून घेतात. हिमालयाच्या पाच रांगांमधील धौलाधार रांग इथून स्पष्ट दिसते आणि त्या कॅनव्हास वर मंदिराच दृश्य अवाक करत. कोरीव काम केवळ मंदिराच्या आत आहे असं नाही तर बाह्य भिंतीवर सुद्धा सुंदर शिल्प कोरलेली आहेत. विष्णूच्या दशावतारांपैकी वराह, कुर्म, मत्स्य, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, आणि कृष्ण अवतारांची शिल्पे सहज ओळखू येतात. मंदिराच्या तटबंदीबाहेर एक पुष्करणी सुद्धा आहे.


मंदिराच्या तटबंदी बाहेर एक पुष्करिणी आहे. त्यात सध्या पाणी नसलं तरी पूर्वीचं वैभव लपत नाही. एकूणच शिल्प वैभवानी समृद्ध असं हे मंदिर, हिमालयाची पार्श्वभूमी, खळाळत वाहणारी नदी, आणि या सगळ्यांच्या मिलाफाने जे सौंदर्य तयार होतं ते काही औरच आहे. त्याची अनुभूती प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय येणे नाही...
No comments:
Post a Comment