
पुण्याच्या पूर्वेस साधारण ८०-९० किलोमीटर अंतरावर, जेजुरीच्या पुढे बारामती रस्त्यावर लोणी भापकर हे गाव आहे. तसे पाहिले तर इतर चार गावांसारखेच हे गाव. पण शिल्पवैभवाने समृद्ध. गावात शिरल्यावर मल्लिकार्जुन देवस्थानचा रस्ता विचारात जायचे. वाटेत उजव्या हाताला सोमेश्वर नावाचं एक छोटेखानी मंदिर आहे. त्यावर काही विशेष कोरीव काम नाही पण समोरच्या मोकळ्या जागेत सुमारे १५-२० वीरगळ आहेत. अर्थात पूर्वी कधीतरी इथे मोठ्या लढाया झाल्या असणार किंवा इथले वीर समरांगणी धारातीर्थी पडले असणार. इतिहासाच्या अभ्यासकांना आणि जाणकारांना हे वीरगळ म्हणजे मोठीच मेजवानी ठरेल.
इथून पुढे उजवीकडे वळून थोडे अंतर गेले की डाव्या हाताला मोठे आणि स्वच्छ प्रांगण दृष्टीस पडते. इथे आहे मल्लिकार्जुन देवस्थान. मंदिराकडे जाताना एका चिंचेच्या झाडाखाली वराहमूर्ती दिसते. मुखाकडचा भाग जरा भग्न झाला आहे परंतु त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. शिल्पाच्या पाठीवरील कोरीवकाम जणू झूल पांघरल्या सारखे वाटते. यावर १४२ मूर्ती अंकित आहेत. त्याशिवाय चारही पायांवर विविध मूर्ती आणि आभूषणे कोरलेली आहेत. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात वालूर, चारठाणा, गोसावी पिंपळगाव या जागी वराहमूर्ती सापडल्या आहेत. मध्यप्रदेशात खजुराहो आणि सागर जिल्ह्यातील ऐरन येथे अशा मूर्ती सापडल्याचे उल्लेख आहेत. परंतु एकंदरच अशी शिल्प अत्यंत दुर्मिळ. इसवी सनाच्या १२-१३ शतकापर्यंत अशा यज्ञ वराहांचे पूजन होत असे, त्यानंतर त्यांची जागा विष्णू मूर्तींनी घेतली असावी असे जाणकारांचे मत आहे.

मल्लिकार्जुन मंदिर हे भूमिज शैलीतील असून २ प्रवेशद्वारे आहेत. यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य आहे. आत शिरल्यावर सभामंडप तोलून धरणारे ४ खांब त्यांच्यावरच्या कोरीवकामाने आपले लक्ष वेधून घेतात. छतावरील कोरीवकामसुद्धा लक्षणीय आहे. मंदिराची रचना अर्ध्यापर्यंत दगड आणि त्यावरील शिखर हे विटांमधून अशी आहे. कालौघात १२ व्या शतकातील हे मंदिर जरासे डावीकडे झुकलेले आहे.
मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या अत्यंत सुंदर अशा प्रतिमा आहेत. तसेच डावीकडच्या कोनड्यामध्ये एक भग्न विष्णुमूर्ती आहे. परंतु हातातील आयुधे झिजलीअसल्याने विष्णुमूर्तींच्या २४ प्रकारांपैकी ती कोणती हे ओळखणे कठीण आहे. शिवलिंगाची दिशा हि नेहमीप्रमाणे उत्तरेकडे नसून पूर्वेकडे आहे. अभिषेकाचे तीर्थ वाहून जाण्यासाठीचा मूळ मार्गही येथे नाही. शिवाय गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस कोठेही याला गोमुख / मकरमुख अस्तित्वात नाही. यावरून असे लक्षात येते कि हे मंदिर मूलतः विष्णूंचे होते. परंतु यावनी आक्रमणादरम्यान मूळ मूर्ती भग्न झाल्याकारणाने अथवा लपवली गेल्याने नंतर मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली असावी.
मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यासमोर एक रेखीव अशी पुष्करिणी आहे. काही पायऱ्या उतरून थोडी सपाटी आणि परत पायऱ्या अशी याची रचना आहे. या पुष्करिणीच्या भिंतीमध्ये २४ कोनाडे आहेत. बहुतेक त्यात विष्णूंच्या हातातील आयुधक्रमानुसार २४ प्रकारांच्या एकेक मूर्ती असाव्यात ज्या कालौघात इतरत्र विखुरल्या गेल्या असतील. कदाचित पुष्करिणीमध्ये मूर्तिभन्जकांच्या भीतीने विसर्जित किंवा लपवल्या सुद्धा असतील. पायऱ्यांच्या डाव्या हाताला पुष्करिणीच्या कडेला एक दगडी मंडप आहे. त्यावरसुद्धा अत्यंत सुंदर अशी शिल्पे अंकित आहेत. काही अभ्यासकांच्या मते हा वराह मंडप असून प्रांगणात असलेल्या वराह मूर्तीची मूळ जागा ही असावी.

एकंदरीतच मंदिर, पुष्करिणी आणि वराहमूर्ती असा सुंदर मिलाफ इथे बघायला मिळतो. ऊन, पाऊस, वारा यांचे आघात सोसत हा वारसा शेकडो वर्षे त्याचे अस्तित्व जपून आहे. त्यात सुधारणा करत नाही आली तर किमान आहे त्या अवस्थेत आपण त्याचे जतन करू शकलो तरी खूप आहे.

No comments:
Post a Comment